Thursday, 22 December 2022

“हरिश्चंद्रगड-भैरवगड(शिरपुंजे)-घनचक्कर-गवळीदेव (गवाळदेव)-रतनगड-कळसुबाई” “दिवाळी २०२२ विशेष ट्रेल”

 

“हरिश्चंद्रगड-भैरवगड(शिरपुंजे)-घनचक्कर-गवळीदेव (गवाळदेव)-रतनगड-कळसुबाई”

“दिवाळी २०२२ विशेष ट्रेल”

 

तस सह्याद्रीच लिखाण जवळपास ४ वर्षापासून ओथंबलेले होत. पुण्यात बदली झाल्यापासून मागच्या वर्षभरात दर आठवड्याला किमान एक (कमाल कितीही) असे गड-किल्ले भर्काटन सुरूच आहे. एकच गड वेगवेगळ्या ऋतू मध्ये पाहण म्हणजे निसर्गाच्या अद्भुत कलेचा निरनिराळ्या चष्म्यातून (2D,3D, imax 3D) देखावा पाहण आहे. एखाद्याने पावसाळ्यात गड पहिला कि फक्त पाऊस अन धुके म्हणजे गड वाटतो. एखाद्याने उन्हाळ्यात दिवसा गड चढताना पहिला कि, फक्त ऊन आणि घाम वाटतो. एखाद्याने थंडीत गड पहिला तर महाबळेश्वर ला आलोय अस थंड गारवा  म्हणजे गड वाटतो. तिन्ही ऋतू मध्ये गड पहाण्याची विशिष्ट वेळ असते. ती वेळ फक्त हाडाच्या ट्रेकर ला माहित असते.

तर दिवाळी २०२२ मध्ये काहीतरी विशेष ट्रेल (ट्रेक नाही) करण्याची हौस होती.(अशी हौस दरवर्षी मनाशी येते आणि शरीराची पक्कीच जिरवून जाते). तर यावर्षी “हरिश्चंद्रगड-भैरवगड(शिरपुंजे)-घनचक्कर-गवळीदेव (गवाळदेव)-रतनगड-कळसुबाई” असा करकच्च ट्रेल जवळपास ४० किलोमीटर (नुसताच चढ/उतार) ४ दिवसात पूर्ण करण्याच वार अंगात आल. आता “आला अंगावर तर घेतला शिंगावर” या उक्तीप्रमाणे प्रवास सुरु केला.

 

 

 

“दिवस पहिला – शनिवार” - “देण्याला नाही थार, आड आला शनिवार

सकाळी उठून लवकर निघायचं या हिशोबाने रात्रीच तासभर आवरा-आवर करून दोन बॅगा भरल्या. एका बॅगेत टेंट (आमच्या आईच्या भाषेत “तंबू”), मॅट, शाल, स्व:संरक्षणासाठी कुऱ्हाड (जंगली आणि शहरी दोन्ही प्राण्यांपासून), दुसऱ्या बॅगेत कपडे, दिवाळी विशेष ट्रेल साठी-विशेष दिवाळी फराळ, सनस्क्रीन(गेल्या काही महिन्यात याचा शोध आपल्या जीवनात लागला आणि आमच्या आईच्या भाषेत कुठ काळ तोंड करून आलास या डायलॉग पासून काही प्रमाणात सुटका झाली.) कॅमेरा, टोपी, थंडीचे जर्किंग अस जवळपास एकूण १०/१२ किलोच ओझं झाल. सकाळी लवकर निघायचं या अपेक्षेने सगळी उठाठेव केली पण म्हणतात ना “नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न” त्याप्रमाणे तसच झाल आणि सकाळी सुरु होणारा ट्रेक प्रवास, दुपारी १ ला सुरु झाला. अर्धा दिवस तर बिना ट्रेल आणि बिना प्रवासाचा वाट पाहण्यात निघून गेला. असो; शेवटी “आठाणे महिना सावकास का होईना!” प्रमाणे आपल चारचाकी वाहन (Dragon) हलवलं.

Dracarys- “The bird with Fire and Ice”   (i20)

गेल्या वर्षभरात आपल्या Dracarys ने १४,००० किलोमीटर प्रवास फक्त गडकिल्ले आणि क्वचितच इतर प्रसंगी केला आहे. (तस वर्षभरात Royal Bullet ने देखील ९,००० किमी ची दुचाकीदौड केलेली आहे.) Dracarys ला आता सह्याद्रीच्या घाटवाटा ‘टायरपाठ’ झालेल्या आहेत. एकदाही वाट न चुकता आपोआप टायर वळत आहेत. आतापर्यंत एकदाही engine down झाल नाही कि टायर पंक्चर झाल नाही. निर्जीव असूनही सजीव असल्यासारखा गरम हृदयाचा हा Dracarys आत बसल कि थंड हवेचा झोत अंगावर टाकत असतो. तर या Dracarys वर सगळी मदार टाकून निघालो.

हरिश्चंद्रगड- “जिथ मन रमत आणि अनंत आठवणी जिवंत आहेत.”

आळेफाटा-बोटा-ब्राम्हणवाडा-कोतूळ-कोथळे-पाचनई मार्गे हरिश्चंद्राच्या पायथ्याशी सायंकाळी ५ च्या सुमारास पोहोचलो. आता ४ दिवस शुध्द शाकाहारी जेवण मिळणार असल्यामुळे कोतूळ ला थांबून एका कोंबडीचा फाडशा पाडला. पाचनई गावातील श्री. पोपट बादल यांचेकडे जेवणाच अन गडावरच मुक्कामासाठी टेंट च नियोजन देऊन टाकल. हा माणूस या भागातील सर्व माहिती असलेला कट्टर मावळा आहे. कोकणकडा पूर्ण उतरणारा, ट्रेकिंग च्या जगतातील आदरणीय अरुण सावंत सर यांचेसोबत अनेक वाटा पाहिलेला माणूस आहे. घरून निघतानाच दिवाळी विशेष फराळ यांना देण्याच ठरवलं होत. आपल्या आयुष्यातून काही इतरांना दिल कि हलक वाटत.. अन घेतलं कि डोईजड वाटत. पोपट आणि त्यांची बायको पुढ अन आम्ही माग अस अर्ध्या तासाच्या आत खिंडीत दाखल झालो. या खिंडीच्या आधी डोंगराच्या पोटातून आत गेल्याप्रमाणे वाटत. पावसाळा संपून महिना झाला तरी डाव्या हाताच्या डोंगर माथ्यावरून झिरपणारे झरे ठिपकतच होते. चढून जरा गरम झालेलं शरीर इथ शिंतोड्यासारख्या प्रवाहाखाली उभ केल कि काय गारवा वाटतो.... (जस ऐन मे महिन्यात मराठवाड्यात दुपारी लग्नात गेल कि, उन्हाच्या असह्य झळ्या सुरु असतात अन सुरवातीच्या गेट वर शीतल कुलर चा मारा केल्यावर एकदम शरीराचा थकवा दूर झाल्याने वाटतो तसाच इथ वाटतो.) नुसतच उभ राहू वाटत. कोसळणारे तुषार असेच कायम गडावर पोहचेपर्यंत पडू दे अस वाटत राहत.

इथून आम्ही वेगळे डायरेक्ट कोकणकडा आणि ते दोघे हरिश्चंद्र मंदिराकडे अस वेगवेगळे झालो. या ठिकाणी लहान धबधबा पावसात कोसळतो आणि बाकी ऋतू मध्ये नितळ सुंदर पाणी साठलेलं असत. या ओढ्याच्या ठिकाणावरून एक रस्ता उजवीकडे जाणारी वाट कोकणकड्याकडे जाते आणि डावी वाट जी जास्त मळलेली आहे ती हरिश्चंद्र मंदिराकडे जाते. मंदिराच्या वाटेने ९९% लोक जातात कारण वाट सोप्पी, सहज अन मोठी आहे. ज्यांना मंदिरापेक्षा कोकणकडा गाठायचा आहे त्यांनी उजवी वाट (माहितगार व्यक्ती असेल तरच धाडस करावे) धरावी. आम्ही उजव्या वाटेने कोकणकड्याच्या दिशेने निघालो; बऱ्याच वर्षांनी या वाटेने जाणार होतो म्हणून थोडी धाकधूक होतीच. या वाटेने जरा पुढ गेल कि अजून एक ओढा लागतो; इथून पुन्हा उजवीकडच्या डोंगरावर चढणारी सरळ उभी वाट १५ मिनिटात एका उंच डोंगरावर पोहचवते. आणि ओढ्याच्या डाव्या हाताने वर गेल कि एक अवघड वाट धबधब्याच्या खाली नेऊन पोहचवते. इथून धबधबा डाव्या हाताला ठेवून वर चढता येत.(अवघड श्रेणी आणि निसरडी वाट आहे.) आज अवघड काही करायचं नियोजन नव्हत. त्यामुळ मागचीच ओढा ओलांडून सरळ उभी वाट १५ मिनिटात डोंगरमाथ्यावर पोहचवते. इथून तारामती शिखर, बालेकिल्ला एका विशिष्ट कोनात दिसतो. घड्याळ पाहिलं तर एव्हाना सांयकाळचे ६ वाजले होते. आता कोकणकड्यावरून सूर्यास्त पहायची ओढ लागली होती. वर चढून गेल कि इथून डाव्या दिशेला डोंगर कडेकडेने चालायला लागल कि पुन्हा १०/१५ मिनिटात कोकणकड्याच्या बरोबर मागे जो नैसर्गिक प्रवाहाचा धबधबा आहे; त्या धबधब्याच्या उजवीकडून झाडीतून वर जाणारी चढण पार केली कि, कड्याची लोखंडी रेलिंग दिसते. कोकणकड्यावर गेल कि लोखंडी रेलिंग पर्यंतचे जग वेगळे आणि रेलिंग नंतरचे जग पूर्ण वेगळे. महाराष्ट्रात जन्म घेतला असेल आणि कोकणकडा न पाहताच मृत्यू गाठला असेल तर ते जगण देखील व्यर्थ आहे. निसर्ग एकाचवेळी भीषण रौद्र आणि अथांग सुंदर असा दैदिप्यमान असू शकतो हे इथ आल्यावरच कळत. इथून खालच दृश्य पहायचं म्हणजे अगदी झोपून पहाव लागत कारण आपण ज्या कड्यावर असतो त्या कड्याच्या खाली काहीच नाही. जवळपास ३००० फुटांचा अंतर्वक्र स्वरूपाचा हा कडा झोपून पहिला कि डोक गरगरणार नाही अस कोणाचच होत नाही. वाऱ्याच्या या कायिक विदारणाचा परिणाम म्हणजे कोकणचा खालचा वारा कड्याच्या बरोबर मधल्या पोटाच्या भागात घुसत राहतो, मुसळत राहतो, भिंगत राहतो. रोहिदास शिखरापासून कडा आतमध्ये वक्र झालेला आहे. तसाच तो पुढ सीतेच्या डोंगरापर्यंत भिंगला आहे. रोहिदास ते सीतेच्या माळामध्ये अनुक्रमे माकडनाळ, कालभैरव, कडा, नळीची वाट असा अजस्त्र आणि बेलाग डोंगररचना आहे. तर आम्ही सायंकाळी ६:३० वाजता कोकणकड्याच दर्शन घेतलं. आजवर कित्येकदा हा कडा पहिला आहे, त्याची मोजदाद नाही. कोणी चल म्हणल कि निघायचं, ऊन, पाऊस, थंडी यात कायम सुंदरता चराचरात असते! या कोकणकड्यासाठी खिरेश्वर गावातून टोलार खिंडीतून, जुन्नर दरवाज्याने, पाचनई गावातून अति-मळलेल्या वाटेने, बैल घाट वाटेने, वाल्हीवरे गावातून नळीच्या वाटेने, माकडनाळेने, केळेवाडी गावातून साधळे घाट वाटेने, कोथळे गावातून टोलार खिंडीने, अशा ८ वाटांनी चढाई/उतराई केली आहे. तरीही कडा पहायच व्यसन सुटत नाही.  

“आधीच हौस अन त्यात पडला पाऊस”

 कडा पाहून रात्री ८ वाजता हरिश्चंद्र मंदिराकडे पोपट बादल यांचे हॉटेल वजा घराकडे प्रस्थान केल. मंदिरापासून गणेश लेण्यांकडे चालत निघाल कि हॉटेल साईराज नावाचा फ्लेक्स पाहायला मिळेल. सकस जेवण, लाघवी बोलण, उत्तम आपुलकी इथ मिळणारच. हवेत गारवा जाणवत होता. कड्यावरच टेंट टाकायचा विचार होता. कड्यापेक्षा मंदिराकडे थंड वारा कमी आणि सहन करण्यासारखा होता पण “आधीच हौस त्यात पडला पाऊस” प्रमाणे झोपायचं तर कोकणकड्यावरच ! हे ठरलं होत. पोपट यांच्या हॉटेल वर बाजरी भाकर-बटाटा भाजी-वरण-भात असा बिना मसालेदार जेवणाचा बेत उरकला. त्यांच्याकडून टेंट घेऊन कड्याकड रात्री १० वाजता निघालो. भयाण आणि निरव शांतता, मागे पुढे कोणीच नाही एकदम मस्त वाटत! पौर्णिमेच्या आधला दिवस असल्याने टोर्च ची काहीच गरज नव्हती. कोकणकड्याच्या पठारावर तंबू ठोकला. वाऱ्याचा वेग असा प्रचंड होता कि दहा मिनिट देखील झोप लागली नाही. नुसतच गार वाटत होत. कधी एकदा सकाळ होतीय अस वाटत होत. आधीच हौस अन त्यात पडला पाऊस या उक्तीप्रमाणे शरीराची रात्रभर चाळण झाली होती. दिवस उजडायच्या आसपास तंबू गुंडाळून, आवारावर करून, कड्यावर जाऊन पुन्हा एकदा डोळ्यांच्या कॅमेरात कोकणकड्याच रौद्र न उन्मत्त रूप पाहिलं.

 

 

“दिवस दूसरा रविवार” - “आज जीवाला त्रास लई बेक्कार.. कारण चढाई उतराई एकूण डोंगार चार!

पुन्हा कड्यावरून हरिश्चंद्र मंदिराकडे बोजा-बिस्तरा घेऊन रमत-गमत ८ वाजण्याच्या सुमारास पोहोचलो. गणेश लेण्यांच ओझरत दर्शन घेतल. संत मुक्ताबाईचे शिष्य संत चांगदेवांनी याच लेण्यांमध्ये तपश्चर्या करून तत्त्वसार नावाचा ग्रंथ लिहिला. मस्तपैकी चहा घेतला, दिवाळी फराळाचे तुकडे पोट-भट्टीत टाकले. भट्टी (पोट) ताजीतवानी झाली. आजचा दिवस मोठा होता कारण खूप चालयच बाकी होत. हरिश्चंद्राच दर्शन घेऊन खालची महादेवाची पिंड असलेली केदारेश्वराची गुफा पहिली. या गुफेबद्दल स्थानिक दंतकथा प्रचलित आहे कि, “या केदारेश्वराची गुहेत चार खांबावर आधारित जे शिवलिंग आहे त्यातील ३ खांब पडलेले आहेत, फक्त एकाच खांबावर आधारित आहे. हे चार खांब म्हणजेच चार युग आहेत; कृत, द्वापार, सत आणि कलि या चार युगांपैकी ३ युग संपून गेले आहेत, यातील शेवटचा चौथा खांब म्हणजे कलियुग आहे. आणि हा खांब पडला कि कलियुग बुडणार.” दंतकथा होतात आणि त्यावर चर्चा चालूच असतात. पण माणसाने वैज्ञानिक दृष्टीकोन समोर ठेवून प्रत्येक वस्तू, घटना, साहित्य, कथा यांचा सारासार विचार केला पाहिजे. लहान असलेली गुहा शालिवाहन कालखंडाच्या आधी काही काळापूर्वी खोदकाम करून तयार करण्यात आलेली आहे. या गुहेला चौरस आकार असून मधोमध एक मीटर उंचीचे शिवलिंग आणि २ मीटर रुंदीचा चौथरा तयार केलेला आहे. कोरीव नक्षीकाम केल्यामुळे बांधकाम अतिशय सुबक आहे. एका पूर्ण पाषाण खडकाला खोदताना चार खांब वरून खाली अशा प्रकारे खोदत आणले आहेत. आता विषय खांब पडण्याचा “तर गुहेत कायम ३-४ फुट पाणी साठलेलं असत. पाण्यासोबत अनेक धातूंचे कार्बोनेट विघटिकरण होऊन खडकाची झीज होत  असते. त्यामुळे या खांबांच कायिक अपक्षय होत आहे. त्यामुळे अधोमुखी लवणस्तंभाप्रमाणे याचे स्वरूप आहे. त्यामुळ खाली दाखवलेल्या प्रतिमेमध्ये अर्धवट तुटलेले खांब आजही टिकून आहेत.”




 कळसूआई : “वो बुलाती है और हम जाते है.”

मंदिराच्या समोर पटांगणात उभ राहील कि पूर्वेकडे जी डोंगररांग आहे, घनचक्कर आणि गवळीदेव यांच्या बरोबर मधोमध मधोमध कळसुआई (महाराष्ट्रच ऐव्हरेस्ट) डोक काढून खुणावत होत. आता तुझ्याकडच येण आहे हे नजरेतून सांगितल, हवेन ते आपसूकच ऐकून घेतल, प्रकाशाच्या वेगाने ते तिच्यापर्यंत पोहचल सुद्धा असेल.

आता दुपार व्हायच्या आत पाचनई गाव गाठायच होत म्हणून सकाळी 10 ला खाली उतराईची वाट धरली. दीड तासात आरामात खाली पोहोचलो. जाताना शाळकरी भारमलांकडून मुद्दाम लिंबू सरबत घेतल. गडावर गेल की मुद्दाम आस काहीतरी घेतल पाहिजे कारण आपल्या काही पैशाच्या खर्चामुळे एखाद्या घरातील पोटापाण्याची सोय होत असते. शहरात बिन कामाच्या गोष्टीवर आपण कितीवेळा तरी पैसा खर्च करतो ज्यात multi-brand कंपण्या मेलेल्यांच्या टाळूवरच देखील लोणी खातात.

“आज दिवस मोठा : पायगाडी चा खेळ-खंडोबा”

पाचनई गावात उतरून Dracarys मध्ये बुड टेकवल. आलेला थकवा थंडगार वाऱ्याने भरून काढला. पाचनई-आंबीत-शिरपुंजे घाटमार्गे थेट शिरपुंजे (भैरवगड) च्या गेट वर पोहोचलो. एव्हाना दुपारचे अकरा वाजले होते. आता “भैरवगड-घनचक्कर-गवळीदेव-मुडा-कात्राबाई-रतनगड” असा थोरला पल्ला पार पाडायचा होता. आधीच दुपार झालेली, अर्धा दिवस हाताला असताना काय कराव सुचत नव्हत तेव्हा विचार करत बसलो होतो. तेवढ्यात भैरवगड च्या सुरवातीला जे गेट आहे त्याठिकाणी एकमेव घर ज्याचं आहे ते श्री. गणपत साबळे देवासारखे धावले. तसा सगळा परिसर आपल्या परिचयाचा पण एखादा स्थानिक गावकरी सोबत असेल तर परिसर सर्व बाजूने धुंडाळता येतो; नाहीतर नुसतीच पायपीट होते. एवढा मोठा टप्पा पार करणे जवळपास अशक्य होत तरीही जिथवर जाता येईन तिथवर जायचं ठरवलं. गणपत साबळे तरुण तुकतुकीत चपळ माणूस, सह्याद्रीच्या या भैरवगड-घनचक्कर च्या बाजूच्या डोंगरांची पूर्ण माहिती आहे. जेव्हा इथ तुम्हाला जाण शक्य होईन तेव्हा या माणसाला सोबत न्या. प्रत्येक डोंगर विश्लेषण करून सांगणारा माहितगार माणूस. तर आम्ही गणपत साहेबांना सोबत घेऊन चढायच ठरवलं. पण साहेबांच जेवण अजून झाल नव्हत. जेवण करून खिंडीत या अस सांगून आम्ही भैरवगड च्या दिशेन कूच केली. सरळ दांडाने वर जाणारी वाट तुम्हाला एका खिंडीत पोहचवते. १०/२० सिमेंट च्या सुरवातीच्या पायऱ्या मग नेहमीची वाट, मग थोड्या वेळाने जिथ अवघड दगड पुढ आलेले आहेत, त्या दगडांना कोरलेल्या सुंदर पायऱ्या, अस समीकरण करत शेवटी खिंडी मधल्या पायऱ्या चढून खिंडीत आलो.

 या खिंडीतून पलीकडे जानेवाडी दिसते, तिथून देखील चढाई करता येते पण या बाजूने आरामात चढता येते आणि वन विभागाने अतिशय चांगल्या रेलिंग बसविल्या आहेत. तर खिंडीतून डाव्या बाजूला पाहिलं तर कलावंतीण बुरुज चढताना जशा पायऱ्या आहेत तशा पायऱ्या नजरेस पडतात. पायऱ्यांचा अंश जवळपास ८० डिग्री चा आहे. पण दोन्ही बाजूला रेलिंग पक्की बसवली असल्याने काळजी करायची चिंता नाही. २०/३० पायऱ्यांची रेलिंग चढाई रेलून केली कि गडावर दाखल. गडाचा पसारा छोटेखाणी असल्यामुळे गड पहायला जास्त वेळ लागत नाही. या पायर्‍या चढुन वर आल्यावर गडाची तटबंदी आणि उत्तराभिमुख उध्वस्त प्रवेशव्दार दिसते. प्रवेशव्दारातून गडावर प्रवेश केल्यावर उजव्या बाजुला कातळात कोरलेली ४ टाकी आहेत. त्याच्या पुढे एक कोरड टाक आहे. ते पाहुन गुहेकडे (दक्षिणेकडे) जाण्यार्‍या पायवाटेने चालायला सुरुवात केल्यावर डाव्या बाजुला मोठ खांब टाक आहे. टाक्यापर्यंत जाण्यासाठी असलेला मार्गही कातळ कोरुन बनवलेला आहे. या टाक्याच्या बाजुला एक रांजण खळगा कोरलेला आहे. तर टाक्याच्या वरच्या बाजूला तीन रांजण खळगे खोदलेले आहेत.टाक आणि त्यावरील रांजण खळगे पाहुन परत पायवाटेवर येउन गुहेच्या दिशेने जाताना उजव्या बाजुला कातळात कोरलेली ४ टाकी आहेत. त्याच्या वरच्या बाजुला अजुन ४ पाण्याची टाकी आहेत. टाक्याच्या बाजूला कातळात कोरलेली गुहा आहे. या गुहेला कमान असलेल प्रवेशव्दारही आहे. टाक आणि गुहा पाहुन परत पायवाटेवर येउन उत्तरेला भैरोबाच्या गुहेकडे जातांना उजव्या बाजुला एक साडेचार फुट उंच वीरगळ आहे. पुढे डाव्या बाजुला, गुहेच्या वरच्या बाजूला एक वीरगळ. या वीरगळीच्या चारही बाजू कोरलेल्या आहेत. विरगळी जवळ गणपतीच्या झिजलेल्या मुर्ती शेंदुर फासुन ठेवलेल्या आहेत. त्या पाहुन कातळात खोदलेल्या पायर्‍या उतरुन कड्याच्या टोकावर कोरलेल्या भैरोबाच्या गुहेत जाताना बाहेरच्या बाजुला एक वीरगळ ठेवलेली आहे. गुहेत भैरोबाची अश्वारुढ मुर्ती आहे. भैरोबाच्या गुहेच्या बाजुला अस्लेल्या गुहेत १० जण राहु शकतात. गुहेच्या कड्याकडील बाजुला रेलिंग लावलेले आहे. येथुन शिरपुंजे गाव आणि आजुबाजूचा परीसर दिसतो. या रेलिंगच्या एका बाजुला फाटक बसवलेले आहे. तेथुन खाली उतरण्याचा मार्ग आहे. खालच्या बाजुस एक गुहा आहे.

“स्वर्ग शिडी: पतवडी डोंगर”

एकूण सर्व परिसर पाहून घेऊन मग सुंदर पायऱ्या उतरून खिंडीत बसलोच होतो इतक्यात जेवण करून गणपत साहेब दाखल झाले. त्यांना घेऊन (ते आम्हाला घेऊन) घनचक्कर ची शिडी चढून गेलो. महाराष्ट्रातील सर्वात उंचीच्या ठिकाणी एवढ्या लांब अंतराची शिडी कशी काय बसवली असेल याचा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. शिडी चढताना पायाखाली खोल कडा आहे. शिडी वरून जाताना ज्यांना उंचीची भीती वाटत असेल त्यांनी खाली पाहिलं तर चक्कर आल्याशिवाय राहणार नाही. शिडी वर चालताना Adventure Park मध्ये Ride घेतल्याची मज्जा जरूर येते. स्वर्गात जायचा रस्ता देखील असाच असावा. वर चढून गेल कि सपाटी आणि थोड पुढ गेल कि एका उंच डोंगरावर कारवी मधून जाता येत. इथून डाव्या अंगाला हरिश्चंद्र अतिशय स्पष्ट आणि ठळक दिसतो. हरिश्चंद्र तसा माळशेज घाटातून देखील दिसतो पण इथून हरिश्चंद्राच दर्शन त्यात आंबीत धरण म्हणजे निसर्गाने वेळ काढून अतिशय सुरेख रांगोळी काढल्यासारख वाटत. याच डोंगरावरून उजव्या बाजूला कळसुबाई –साकीरा-किरडा-अलंग मदन कुलंग डोंगर रांग आणि त्यामध्ये भंडारदरा धरण म्हणजे कोणत्या दोन्ही डोळे अगदी भरून येईपर्यंत निसर्गाच विलोभनीय दर्शन होत. विलोभनीय या शब्दाचा अर्थ इथ आल तरच अनुभवता येईन अस हे ठिकाण आहे. त्या डोंगरावरून एका उताराने हलक उतरलो असता एका पुन्हा दुसऱ्या उंच घनचक्कर च्या डोंगरात पोहोचतो. घनचक्कर नक्कीच चक्कर आणणार असा वाटत होता कारण वाट संपत नव्हती आणि घनचक्कर च शिखर सुद्धा दिसत नव्हत.

घनचक्कर कडे जाणारी पतवडीची शिडी


 दर ७ वर्षाने आलेली रतनगडावर जांभळी-गुलाबी कारवी पाहण्यासाठी खूप लोकांनी गर्दी केलेली होती. पण घनचक्कर वर त्यापेक्षा जास्त फुल फुलेलेली असतात. निसर्ग आपल्याला मुक्त हाताने भरभरून देत असतो आणि आपण ओरबाडून घेत असतो याच उदाहरण म्हणजे ऑक्टोबर शेवटी आणि नोव्हेबर सुरवातीला रतनगडावर केलेली भयानक गर्दी. इथ येणाऱ्या प्रत्येकाला फुल पहायची होती. पुणे-मुंबई वरून मेंढर भरल्यासारखी माणस भरून विविध चंगळवादी ट्रेकिंग ग्रुप ने १००/२०० अशा संख्येन लोक आणली होती. त्यात ग्रुप लीडर स्वताला गडाचे मालक असल्यासारखं वागत होते. ज्यांना वर जायला भेटलं त्यापैकी ९०% वीरांनी (आणि वीरांगना यांनी) डोळ्यांनी निसर्गाची उधळण बघण्याऐवजी insta reel/post च्या नावाखाली चिक्कार वेळ घालवला. फोटो आणि व्हीडीओ मुळे इथल्या कारवीच अतोनात नुकसान केल. डोळ्यांना सुद्धा दिसत नाहीत अशा निसर्गातील जीवांचे पायदळी तुडवून नुकसान केले. हाडाचा ट्रेकर इथल्या गर्दीत कधीच येणार नाही. इथ काही दुर्घटना झाली असती तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला असता एवढी गर्दी, एवढी मेंढर! सह्याद्री एक दिवस याच उत्तर नक्कीच देईन! त्यामुळे जेवढी गर्दी टाळता येईन आणि पैसे/नाव कमावणाऱ्या चंगळवादी ट्रेकिंग ग्रुप यांना आवाहन आहे कि कोणाला जीव गमवावा लागेल अस काही कृत्य करू नका.

या घनचक्कर वर रतनगड पेक्षा जास्त फुल त्या काळात होती. कधी कधी वाटत बर आहे कि जास्त लोकांना सह्यादी कळूच नये. असो. घनचक्कर ला जाताना एका ठिकाणी उघड-बोडक मंदिर आहे. याच नाव आहे गवळीवाडा; सर्व गुर-ढोर चारणाऱ्या गुराख्यांचा देव म्हणून मानतात. अस म्हणतात कि इथ अनादी काळापासून सगळे गवळी एकत्र येतात. विस्तीर्ण अस पठार आणि पुन्हा एक चढ लागलेला डोंगर अस विस्मयकारक दृश्य आपण बघतो.गवळीवाड्यापासून उजवीकडे वळाल कि यु-टर्न घेऊन पुन्हा डोंगराच्या कोपऱ्यातून पुन्हा भैरवगड कडे जाणारी एक वाट आहे. याच अजब वाटेच वर्णन पुढ केल आहे.

गवळीवाडा


घनचक्कर च नाव घनचक्करच का?

तर यु-टर्न न घेता पुन्हा वर चढत गेल कि उंच डोंगर चढल कि घनचक्कर च दर्शन होत. त्याआधी डाव्या हाताला घोडेवाडा नावाच विस्तीर्ण काळ्याकुट्ट रंगाच पठार आणि त्यावर कडेलोट सारख पाणी वाहतानाचा अरुंद झरा नजरेस मिळतो. जुलै ते जानेवारी पर्यंत इथ कमी-जास्त प्रमाणात पाणी मिळत. या घोडेवाड्याच्या अलीकडेच खोलगट भागात उंच झाडे असलेली दाट झाडी आहे. इथच १२ महिने पिण्याच्या पाण्याच ठिकाण आहे. घनचक्कर नजरेच्या टप्प्यात आला होता; सरळ पाहिलं तर ४०/५० फुटाचा गवती कडा आणि त्यावर काळ्या दगडांची बुरूजासारखी रचना दिसते पण सरळ चढण थोड अवघड आहे. त्यापेक्षा एक वाट डावीकडे दूरपर्यंत घेऊन जाते. एकदम आरामशीर पण खूप दूरची वाट होती. आता मोक्कार गवत-कारवी–कुसळ याचं संमिश्र अस उभ चढण चढलो. अवघड चढण उजव-डाव झिग-झ्याग पद्धतीने वर चढलो. पायाखाली काहीच दिसत नव्हत, चुकून एखादा साप डाराडूर होऊन पडू नये अन त्यावर आपला पाय पडू नये याची मनात धास्ती घेऊन गवत-कारवी-कुसळ मधून वाट काढत झटक्यात घनचक्कर च्या सर्वोच्च ठिकाणी अवतरलो. उजव्या बाजूला भंडारदरा अतिशय सुंदर दिसत होता. खाली राजूर च्या उंच इमारती, मग मुतखेल, पाबरगड, आणि दूरवर कळसुबाई रांग एकदम ठळक दिसते. घनचक्कर वर पोहोचल्यावर निसर्गाची एवढी छायाचित्र काढून घेतली, कि स्वतःची आठवण म्हणून चित्र घेण विसरलो. गणपत यांनी स्वतहून आमचे काही फोटो काढले तेव्हा अजून जरा angle सेट करून चांगले फोटो काढायचा प्रयत्न केला पण डोक्यावर ऊन तापल असताना फोटो चा मोह बरा नसतोच. गवळी देव समोर दिसत होता. आता वेळ कमी होता तरी गवळीदेव न करता माघारी फिरणं मनावर सुरी चालवण्यासारख अवघड होत. जिथून घनचक्कर गवतातून चढलो तिथून न चढता गवळीदेव च्या दिशेने निघालो. खाली पूर्ण खिंड उतरून पुन्हा गवळीदेव गाठायचं म्हणजे रात्र इथच होणार अस वाटत होत. गवळीदेवाला इथूनच बिलगून घेतलं आणि परतीची वाट धरली. इथून पुन्हा गवळीवाड्याच्या जवळ पोहचायला अर्धा तासभर लागला.



माणूस अजूनही गुहेत राहतो!

दिवस आता मावळतीकड झुकला होता. उतरण असल्यामुळे पावलं झपाझप चालली होती. मधोमध खिंडीत पोहोचलो, मस्त दिवाळी चा फराळ खाल्ला, फळ खाल्ली, दिवसभराची उठाठेव कामी आल्याच समाधान खिशात ठेवून आता भैरवगड च्या मधल्या खिंडीत पोहचायचं ठरवलं. या खिंडीतून दोन दिशेला वाटा आहेत. डावी वाट थेट शिरपुंजे गावात उतरते. उजवी वाट कड्याला अगदीच चिकटून भैरवगडाच्या खिंडीत नेते. या वाटेने जाताना दोन गुहा लागतात आणि दोन्ही गुहेत २ कुटुंब नांदत आहेत. होय गुहेत. गुहेत कशी राहत असावी असा प्रश्न सर्वाना पडणे साहजिकच आहे. एका बाजूला गुहा डोंगराच्या पोटाच्या आत कोरली आहे आणि गुहा ज्या बाजूला उघडी पडणार आहे तिथ कारवीच्या फांद्या,झाडे,काठ्यांनी गुहा बंदिस्त केली आहे. गुहा खाली शेणा-मातीने सारवल्या आहेत. पहिल्या गुहेत १०/१२ गाई-म्हशी, शेळ्या असा पसारा गुहेच्या कोपऱ्याकडे अंथरून-पांघरून तिथच शेजारी स्वयंपाकाची भांडी...संपल. जीवन जगण्यासाठी जेवढ गरजेच आहे तेवढ आणि निसर्ग कृपेने उपासमार कधीच होणार नाही अस श्रीमंत जगण. गुहेच्या तोंडाला लाकडी दरवाजा आहे; या दरवाज्यावर विशिष्ट जातीच्या झाडांच्या फांद्या – पाने लावलेली आहेत. या झाडांना टोकदार सूक्ष्म काटे आहेत. या भागात वाघ, बिबट्या यांचा वावर जास्त असल्यामुळे या विशिष्ट वनस्पती च्या वासापासून दूर राहण जंगली प्राणी पसंद करतात.

माणूस आजही गुहेत राहतो. 


खिंडीपासून या पहिल्या गुहेपर्यंत रस्ता बऱ्यापैकी मळलेला आहे. या गुहेतील नैसर्गिक उताराचा वापर करून गाई-म्हशीचे मलमूत्र शेणखताच्या रूपात आपोआप कड्याखाली कोसळत जात. कड्याखालून तसंच पुढ गेल की वाट थोडी अरुंद होते;जेमतेम फुटभर रुंद उजव्या बाजूला कडा आणि डाव्या बाजूला दरी; किंचित भीती वाटते. पुढ गेल की दुसरी गुहा न त्यातल घर. रचना जवळपास सारखीच. निसर्ग न माणूस सहचर प्राचीन अनादी काळापासून कसा होता हे पाहण्यासाठी जीवनात एकदा तरी इथ आल पाहिजे. इथून पुन्हा भैरवगडाच्या खिंडीत जाणारी आडवी वाट आहे. जेमतेम फुटभराची वाट लगेच अर्ध्या फुटावर येते, किंचित अवघड आता हृदयात धडधड वाढवते. अर्ध्या फुटाची वाट फक्त एक पंजा बसेल एवढी अरुंद होते. खाली बसता येत नाही आणि उभ राहील तर उजवी दरी “थेट ये खाली, वाट पाहते” अशा रूपाने हसतेय अस वाटत. ज्यांना उंचीची भीती वाटते त्यांनी या वाटेन येन शक्यतो टाळावच. वाट कधी एकदा संपतीय अस झालेल १० मिनिटात भैरवगडाच्या खिंडीत दाखल झालो. गणपत यांनी सांगितल की या दोन्ही गुहेत राहणारी माणस रोज याच वाटेने ये-जा करतात. नुसतीच ये-जा नाही तर डोक्यावर ३०-४० किलो च ओझ घेऊन! धन्य ती माणस आणि धन्य ती जीवनपद्धती!

या खिंडीतून अर्ध्या तासात पुन्हा जिथून पायऱ्या सुरू होतात त्या गेट वर येऊन पोहोचलो. गणपत यांच्या घरी फ्रेश झालो. चहा घेतला. मन ताजतवाण झाल. गणपत साबळे यांचा स्वभाव आणि निसर्ग दाखवण्याची आवड यामुळे यांची आठवण सदा स्मरणात राहील.

संध्याकाळी ६ ला शिरपुंज्यावरून निघालो भंडारदरा (शेंडी) ला तासाभरात पोहोचलो. गेट वर चौकशी झाली. तिथून रतनवाडी १३ किलोमीटर चा पट्टा म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात अभद्र रस्ता आहे. पहिला आणि दूसरा असे दोनच गियर गाडीला वापरावे लागतात. कुठ फुटभर; कुठ हातभर खड्डे आहेत. त्यात कळस म्हणजे रस्ता असा सरळसोट नाहीच, वळणावळणाचा आणि चढ उतराचा रस्ता त्यामुळे समोरून वाहन आल की गाडी रस्त्याच्या खाली उतरवावी लागतेच. चढ-उतारावर दगड-धोंडे एवढ्या प्रमाणात आहेत की आपल्याच टायर ने आपल्याच गाडीला इजा होईन नाहीतर जागेवर टायर फाटून जाईन असा १३ किमी चा रस्ता पार करायला दीड तास लागला. रतनवाडी मध्ये राहायची व्यवस्था आधीच केलेली होती त्यामुळ हलक वाटत होत. व्यवस्था झाली नसती तर होताच आपला तंबू! रात्री झकास पैकी अंड्याची भाजी-तांदळाची भाकरी खाल्ली. आणि बेडवर पडलो. दहा सेकंदात कशी झोप लागली कळलीच नाही. 

दिवस ३ राः “नवीन वाट शोधण्याचा दिवस”

रतन गड (सह्याद्री च रत्न : The Jewel Of Sahyadri)

सकाळी ५ ला उठून थंडगार पाण्याने आंघोळ करून जरा ताज वाटल. (बर्फासारख्या पाण्याने तशी चांगलीच जिरते). रतनवाडी मधून आज रतनगडावर जाण्याची ४ थी वेळ! रतनगड साम्रद गावातून देखील चढता येतो. रतनवाडी मधून सकाळी ७ ला चढण सुरू केल. वाट मळलेली असल्यामुळे आणि थंडगार वारा झोंबत असल्यामुळे मस्त वाटत होत. रतनगडच नेढ दुरून खुनवत होत. थोडी चढ आणि सपाटी संपली की डोंगरच्या कडे कडेने वर सरकणारी वाटेने निघालो एका ठिकाणी दोन वाटा दिसल्या. नेहमीच्या सवयीने डावी वाट माहितीची होती पण उजवी वाट नेमकी कुठ जात असेल याचा मागोवा घ्यावा अस वाटल. (इथूनच उत्सुकतेच रूपांतर भीती मध्ये आणि तिथून धाडसात आणि मग रग जिरण्यात होते.) उजवी वाटेने सरळ कड्याकडे निघालो. उभी आणि दमछाक करणारी वाट, सापडणार नाही अशी वाट चापसत सरळ वर निघालो. भल्या थंडीत घाम निघाला. १५-२० मिनिटात एका कड्याला वाट भिडली इथून उजवीकडे थोडी वाट दिसली म्हणून निघालो. दाट झाडी, माणसांच्या पावलांचा अजिबात मागमूस नाही अस करत वाट संपली आता आलो तिथ पुन्हा माग तसंच उतरण किवा इथूनच वाट काढत कारवीच्या वनात शिरण एवढेच दोन पर्याय होते.  मागे वळून जाण रक्तात नाहीच म्हणून उभी वाट पकडली. गच्च झाडीत उभ राहून जाण शक्यच नव्हत जवळपास गोट्या खेळतो तसंच बसत बसत पुढ सरकलो. वाट शोधत शोधत एका पाण्याच्या ठिकाणी पोहोचलो. रतनगडाचा खुट्टा दिसत नव्हता दिशा कळत होती म्हणून विरुद्ध दिशेन जायच ठरवल. झाडीतून वाट काढत बाहेर पडलो तर समोर एक्सप्रेस हायवे सारखी वाट समोर हजर! फूल यू-टर्न घेऊन वाटेला लागलो. कात्राबाई ला थेट जाऊन भिडणारी ही मोठी वाट आहे. जवळपास ३-४ मीटर रुंद आरामात हत्तीवर जाव अशी वाट आहे. दिशा कळली होती त्यामुळ मनाला हायस वाटल. पुढ गेल की अजून एका ठिकाणी वर जाणारी वाट (खुट्टा आणि रतनगड यांच्या मधली त्र्यंबक दरवाजा मार्ग) आणि तशीच सरळ निवांत शिड्यामार्गे गणेश-हनुमान दरवाज्याने वर जाणारी वाट आहे. उजव्या बाजूने वर चढणारी खुट्टा आणि रतनगड यांच्या मधली त्र्यंबक दरवाजा मार्गाची वाटेने चढण सुरू केल. १५ मिनिटात खुट्टा गाठला. साम्रद गावातून वर येणारी मंडळी गाठ पडली. बुड टेकवून दिवाळी फराळ खाऊन घेतला. लगेच त्र्यंबक दरवाजा गाठला. गार वाऱ्याची झुळूक आणि फुटभर उंचीच्या पायऱ्या चढून वर आलो. आता रेलिंग जागोजागी बसवली असल्यामुळे जास्त भीती वाटत नाही. वर गेल्यावर नेढयात बसलो. महाराष्ट्रात अशा प्रकारचे नेढे काही किल्ल्यांवर आढळते. तिथून तसच खाली रेलिंग मार्गाने उतरलो. समोर पाण्याची टाकी, कल्याण दरवाजा, बारा पायऱ्यांची वाट, गुहा-खोली, गोल बुरुज पाहून घेऊन गडाच्या पूर्वेच्या कड्यावर पोहोचलो. एकदम कड्यावर बुरूज आहे आणि समोर कात्राबाईच्या खोल घळीच दर्शन झाल. सह्याद्री मधील सर्वात जास्त उंचीची घळ समोर पहायला पण नशीब लागत. कधीतरी इथ पण खाली जायच हे मनात ठेऊन रत्नाबाई देवीच दर्शन घेऊन गणेश दरवाज्याच्या वरच्या गुहेत बसून मस्त पैकी चिवडा खाल्ला. एव्हाना सकाळचे ११ वाजले होते. लवकर गड उतरून कळसुबाई गाठायच होत. म्हणून गणेश दरवाज्यानेच खाली उतरलो. एकूण ४ लोखंडी शिड्या उतरलो, या बाजूने उतरण अगदीच सोप्प होत. सोबत भरपूर गर्दी होती. अर्ध्या तासात रमतगमत रतनगड-हरिश्चंद्रगड राजमार्ग (highway) चौक गाठला. निवांत चालत जाणारी आणि डोक्यावर भरपूर सावली असणारी वाट एकदम भारी वाटते. या चौकात आलो. मस्त पैकी गार लिंबू-सरबत घेतल. तिथच एक उत्तर भारतीय अति-गोऱ्या आणि गर्भश्रीमंत मुलामुलींच्या घोळक्यात एक मुलगा सिगारेट ची कांडी फुकत होता त्याला दादा म्हणून नजरेनेच समजवल! त्यानंही समजून घेतल. सिगारेट विझवली. इथ खरी नशा सह्याद्रीमध्ये भटकण्यात आहे. या लोकाना काय कळणार!

त्र्यंबक दरवाजा- रतनगड 


       असो! तिथून पायगाडी हलवली. पहिल्या गियर वर हळू हळू रतनगड उतरायला सुरवात केली. तासाभरात खाली पाण्याच्या तलावाजवळ आलो. गडावरुन खूप छान दिसत हे ठिकाण म्हणून मुद्दाम वाट चुकवून इथवर आलो. भयाण शांतता, दलदल असलेला तलाव, रात्रीच्या वेळी जंगली प्राणी नकीच पाण्यासाठी इथ येत असतील. हॉरर पिक्चर काढावा तर या ठिकाणी! तिथून वर चढून बाबांच्या झोपडीकड आलो. आता सकाळी ज्या वाटेने वर चढलो होतो ती वाट मिळाली. अर्ध्या तासात तिथून रतनवाडी गाठली. यावेळी वेळ भरपूर शिल्लक होता. एकदम आरामात दिवाळी ट्रेल चालू होता.

       रतनवाडी च अमृतेश्वर मंदिर पहिल. हेमाडपंथी मंदिर अतिशय सूस्थितिमध्ये आजही आहे. इथल सर्वात महत्वाच वैशिष्ट्य म्हणजे मंदिरातील महादेवची पिंड पूर्ण पाण्यात आहे. आता बोजा-बिस्तरा dracarus मध्ये टाकून निघालो. रतनवाडी मधून आता पुन्हा भंडारदरा (शेंडी) कडे रात्रीच्या वाटेने जाण्यापेक्षा दुरून साम्रद  गावकडून पांजरे मार्गे कळसुबाई कडे निघालो. पोटात भुकेचा डोंबारा पेटला होता. तासाभरात भंडारदरा गाठल. जाताना समजल की पांजऱ्यातून सुद्धा एक वाट कळसुबाई ला जाते तिथ शिडी बसवली आहे. इथून अंतर ६ किलोमीटर दाखवत होत. म्हणजे जवळपास ५ तास लागणार होते. वाट अजिबात मळलेली नाही.

"अमृतेश्वर"


       भंडारदारा गाठून मस्त पैकी माशांवर ताव मारला तेव्हा सायंकाळचे ५ वाजले होते. जेवण जरा जास्तच दाबून झाल होत. जेवणाचा नियम असा आहे की गड चढण्याआधी काही खाऊ नये. आणि नेमक आम्ही उलट केल होत. आता कळसुबाई चढायची होती आणि पोटाच “पोट आहे की अक्कलकोट” अस झालेल. टंम्म झालेल पोट आणि त्यात कळसुबाई वर जाऊन झोपायच असल्यामुळ बॅग मध्ये टेंट घ्यावा लागणार होता. अक्कलकोटासोबत या टेंट चा डोंगरी कोट अंगावर लगेच चढवायचा नाही म्हणून बारी मध्ये मस्त पैकी तासभर खालीच बसून आराम केला. सूर्य प्रेयसीला भेटायला जातो तसा झपाझप मावळतीला भेटायला निघाला होता. बॅग टेंट सहीत घेतली. बारी गावातून अंधारायला झाल तेव्हा पायगाडीने पहिला गियर टाकला. वज्ज जास्त झालेल. तर २०-२२ किलो वजन घेऊन नेहमीच चढाई होते. पण टम्म जेवल्यामुळे गाडी ने टॉप गियर मध्ये गुरकायला सुरवात केली. तासभर चढल्यावर कळल की गडावर मंगळवार असल्यामुळे कोणीच राहणार नाही. मग तिथच तानाजी खाडे यांच्या हॉटेल वर थांबायच नियोजन केल. भूक अजिबात नव्हती. तासभर गप्पा-टप्पा मारून झाल्या. डोंगरातली माणस अगदी सुतासारखी सरळ. काही मनात नाही. रात्री ९/१० वाजता झोपलो. पण झोप अजिबात येत नव्हती. रात्री-अपरात्री कोणीतरी यायच आणि नेमक टेंट च्या बाजूला खुर्च्यांवर बसून गप्पा मारायच. झोपेच गणित पूर्ण निघून गेल. पहाटे पर्यंत दोघ जण गप्पा मारत बसले होते. मी तोवर ऐकत राहिलो. 


दिवस ४ः आजचा शेवट दिवस।

सकाळी ५ लाच उठलो. आवरावर केली. वज्ज तिथच ठेऊन वर निघालो. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर चढण आज २०२२ मध्ये पहिल्यांदा करत होतो. त्याआधी ३ वेळा भर पावसात जाण झालेल! यावेळी हातात वेळ खूप होता. त्यामुळे आल्हादायक वाटत होत. उभ्या सोंडेने वर चढण दमछाक करणार होत. मागे वळून पाहिलं तर पूर्वेकडून पसरलेली पट्टा-औंढा-बितनगड किल्यांची रांग स्तिमित करत होती. पहिली शिडी, दुसरी शिडी आणि लांबलचक तिसरी शिडी चढून वर आलो. आता सूर्याने डोळे उघडले होते. तपकिरी-केशरी रंग थेट कळसूच्या माथ्यावर पडलेलं दर्शन झाल. इथून आरामदायक चाल होती, पण चढण थांबलेलं नव्हत. गेल्या वेळी पेक्षा कळसू वर हॉटेल ची संख्या नजरेत भरावी अशी होती. आधी कुठतर २/४ हॉटेल दिसायची आता पावलोपावली हॉटेल्स झालेले आहेत. सकाळी ७:३० च्या सुमारास विहिरीजवळ येऊन पोहोचलो. एवढ्या उंचीवर अस थंडगार पाणी ... अमृताशी जरी पैज लावली तरी या पाण्याची गोडी सरसच! तिथच मस्त पैकी वाफाळलेला चहा मारून घेतला.   

गार गार थंडीत चढताना असा चहा घेतला अन अंगात चढलेला सर्व क्षीण घालवून दिला. समोर शिखर दिसत होत. आणि शेवटची शिडी वर बोलावत होती. झपाझप पावलं उचलली. या ठिकाणी आधी एकच शिडी होती. पण वन विभाग-बारी ग्रामस्थ- पांजरे ग्रामस्थ यांनी पांजरे बाजूने अजून एक शिडी बसवली आहे. रेलिंग देखील पांजरे गावातून बसवली आहे. पुढच्या वेळी पांजरे गावातून चढून इंदोरे गावात उतरायचं इथच निश्चित केल. बारी गावातून चढणाऱ्या वाटेपेक्षा इंदोरे गावातून चढणारी वाट कमी वेळात वरती आणते. आणि शिड्यांचा ताप सुद्धा नाही. अखिल महाराष्ट्रात आपण जरी कळसूबाई म्हणत असलो तरी स्थानिक लोक कळसू”आई” म्हणूनच नाव घेतात. जशी तुळजापूरची जगदंबा, कोल्हापूर ची महालक्ष्मी पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात प्रसिद्ध आहे, तशी नाशिक परगण्यात कळसूआई आहे. कालपर्यंत इथ गिर्यारोहकांपेक्षा कैक पटीने स्थानिक भाविक येत होते. आज गिर्यारोहकांची संख्या अति-प्रमाणात वाढलेली आहे.

कळसूआई 


! साम-दाम-दंड-भेद !

बारी-इंदोरे गावातील लोक सध्या पारंपारिक शेती सोडून (कात टाकून) पर्यटन व्यवसाय चालू केलेला आहे. थंडगार पाणी, लिंबू सरबत, चिप्स, वडापाव, मिसळ, पिठलं-भाकरी अस सगळ इथ सगळीकड मिळत. स्थानिक रोजगार मिळाला आहे पण सोबत जागोजागी नकली पर्यटक मानसिकता वाढली आहे. जागोजागी पाणी बॉटल, चिप्स ची पाकीट कळसूआईच्या अंगाखांद्यावर आढळून येतात. आचार्य चाणक्य यांनी सांगितल्याप्रमाणे साम-दाम-दंड-भेद या उक्तीप्रमाणे पर्यटकांना आवाहन-सूचना-धाक-दंड-शिक्षा अशा चढत्या क्रमाने उपाययोजना करणे अपेक्षित आहे. वासोटा किल्ल्यासारख आधीच प्लास्टिक उपद्रव शुल्क घेता येऊ शकते किंवा ब्रम्हगिरी सारख प्लास्टिक चा वापर करून गडावरच छत उभारता येऊ शकत. आज गरज आहे पर्यटन करताना निसर्गास हानी होणार नाही याबाबत प्रशिक्षण घेण्याची.

कळसुबाईच सुरेख दर्शन घेतल. मंदिराच्या मागे पश्चिम दिशेला साकीरा, अलंग-मदन(मलंग नव्हे)-कुलंग खुणावतात. दक्षिणेला आजोबा-रतनगड-कात्राबाई-मुडा-गवळीदेव-घनचक्कर-भैरवगड अशी भक्कम भिंत दिसत होती. ३ दिवसाची पायपीट सार्थकी लागलेली होती. आता घरी जाऊन गाडीवर देह टाकून द्यायचा या भावनेच वेगळच सुख आहे. पुन्हा चौथी शिडी, मग विहीर, मग उतरण, मग तिसरी लांबसडक शिडी, मग दुसरी शिडी, मग पहिली शिडी अस हत्तीसारख हलत-डुलत तासाभरात मुंगीच्या वेगात पहिल्या शिडीवर आलो तेव्हा आठवल कि दुसऱ्या शिडीच्या इथ सावलीला बसल्यावर गॅागल (चष्मा) विसरला, पुन्हा पहिल्या शिडी पासून दुसऱ्या शिडी पर्यंत उभ धावत गेलो कारण बरीच गर्दी मध्ये लागली होती. चढणारी लोक मागे टाकत गॅागल जवळ पोहोचलो. १०/१५ मिनिटात तिथवर कोणी पोहचल नव्हत. एखादी वस्तू हरवली आणि पुन्हा परत मिळाली तर त्या वस्तूची किंमत आणि महत्व दोन्ही वाढते. ३/४ मिनिटात पुन्हा पहिली शिडी हनुमान उड्या मारत गाठली. ३ दिवसात पहिल्यांदाच एवढ्या वेगाने-खाली वर केल. अजूनपण स्नायू निगरघट्ट असल्याची पावती शरीराने दिली. मग रात्रीच्या मुक्कामी खाडेंच्या हॉटेलला आलो. तिथ लिंबू सरबत-पोहे-मॅगी पोटात कोंबून लिटरभर पाणी जिरवल. तिथच तोंड-हातपाय धुतले १५ किलो ची बॅग पाठीवर उभी केली. इथून पुन्हा तासाभरात बारी गावात पोहोचलो. संपल! दुपारपर्यंत पुणे गाठल! आज अजून एक क्षितीज (जे कधीच संपणार नाही!) गाठल. एकूण ४० किलोमीटर ट्रेल झालेला होता! मोबाईल मध्ये ५८००० ढांगा (स्टेप्स) च गणित झालेल। 

! ! आजमितीस ३३३ गिर्यारोहण पूर्ण जाहले ! !

 

 आपलाच,

पंकज शकुंतला अनिल माने 

भटका.........Alfa” 

8668251375 / 7709159044

                                ट्रेक मधील निवडक छायाचित्रे 👇








हरिश्चंद्रगड -कोकणकडा



रोहिदास शिखर- मागे माळशेज घाट- त्याही मागे नाणेघाट


सीतेचा डोंगर- मागे नाफ्ता 

हरिश्चद्र मंदिर


हिच ती शिडी

विहंगम भंडारदरा जलाशय 

आजही माणूस गुहेत राहतो.

निसर्ग 

कळसूआई
कात्राबाई 

कल्याण दरवाजा -बारा पायऱ्यांची वाट- रतनगड